वाढदिवस, श्रद्धांजलीच्या जाहिरातींसाठी ‘या’ ठिकाणांची निवड; महापालिका देणार अधिकृत परवाना

133

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संस्था तसेच नागरिकांना जनजागृतीपर तसेच वाढदिवस, अभिनंदन किंवा श्रद्धांजली सारख्या लहान आकारमानांच्या जाहिरातींसाठी आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील 112 जागांची निवड केली आहे. प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्वानुसार या जागा उपलब्ध होणार आहेत. महापालिका आयुक्तांनी त्यासाठी नागरिकांकडून लेखी सुचना मागविल्या असून आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 17, ब 16, क 16, ड 9, इ 16, फ 20, ग 10 आणि ह 8 अशी 112 ठिकाणे निश्चित केली आहेत.

महापालिकेच्या जागेवर अवैधपणे जाहिरात फलक लावले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच नागरिकांना दृश्य प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. शहराचा दृश्य अवकाश जास्तीत जास्त सुखावह असावा यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यामुळे अशा जाहिरात फलकांचे नियमन करणे महत्वाचे झाले आहे. शहरातील नागरिकांना आवश्यक माहितीचे प्रसारण करायचे असल्यास त्यासाठी रस्ता वाहतुक सुरक्षा आणि शहर सौंदर्य अबाधित राखून महापालिकेतर्फे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय हद्दीत निवडक ठिकाणी 6 बाय 10 फुट आणि 8 बाय 14 फुट आकारमानाचे मजबूत आकर्षक फलक उभे केले जाणार आहेत.

या जाहिरात फलकांवर तात्पुरत्या स्वरूपात योग्य माहिती प्रसारण, सामाजिक उपक्रम, जनजागृती, व्यक्तींचा वाढदिवस, श्रद्धांजली संबंधीची जाहिरात, शुभेच्छा, अभिनंदन आाणि इतर जाहिराती देता येणार आहेत. त्याकरिता एक ते सात दिवसांसाठी परवाना देण्याची कार्यवाही आवश्यक ते शुल्क भरून क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रीया पारदर्शक ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येईल. ज्या ठिकाणी जाहिरात फलक उभे करता येतील अशा प्रस्तावित जागांची यादी तसेच निषिद्ध व नकारात्मक जाहिरातींची यादी आणि परवाना देण्यासाठीच्या अटी-शर्ती यांचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

परवाना देण्यासाठी अटी-शर्ती

# 6 बाय 10 फुट आणि 8 बाय 14 फुट आकारमानाच्या मोजमापाशिवाय जाहिरात फलकालगत लाकडी किवा लोखंडी सांगाडा उभा करून जाहिरात केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल.
# जी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, तिची प्रत अर्जासोबत द्यावी लागणार आहे.
# निषिद्ध मजकूर असलेली जाहिरात नाकारली जाईल.
# संबंधित जाहिरात फलकांसाठी ज्याचा अर्ज प्रथम येईल, त्यास प्राधान्य.
# एकाच स्वरूपाची जाहिरात वेगवेगळ्या संस्था अथवा व्यक्तींच्या नावे अर्ज करून लावता येणार नाही.
# डाऊनलोड केलेला परवाना जाहिरात फलकाच्या खाली उजव्या बाजूस नागरिकांच्या लक्षात येईल, असा छापणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास जाहिरात अवैध समजून काढून घेतली जाईल.
# परवाना मंजुरीसाठी राजकीय दबाव टाकता येणार नाही.
# मंजूर केलेल्या जाहिरात परवान्याचे परस्पर हस्तांतरण करता येणार नाही.
# जाहिरात परवाना मंजूर अथवा नामंजूर करण्याचे अधिकार संबंधित क्षेत्रीय अधिका-यांना राहतील.