वाढत्या बुडीत कर्जाला यूपीए सरकार जबाबदार – रघुराम राजन

244

नवी दिल्ली, दि.११ (पीसीबी) – घोटाळ्यांच्या चौकशीत होणारा विलंब आणि लांबलेल्या निर्णयांमुळे बँकांचे बुडीत कर्ज (एनपीए) वाढत गेले,  असा खुलासा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी  केला.  

भाजपचे ज्येष्ठ खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने रघुराम राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यावर संसदीय समितीला एनपीएबाबत पाठवलेल्या उत्तरात रघुराम राजन यांनी यूपीए सरकारच्या धोरणावर बोट ठेवले.

राजन यांनी वाढत्या बुडीत कर्जाला तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार असल्याचाही दावा केला. सप्टेंबर २०१६ पर्यंत तीन वर्षे आरबीआयचे गव्हर्नर राहिलेले राजन सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये आर्थिक विषयांचे  प्राध्यापक आहेत.

बँकांनी विविध कारणांसाठी कर्ज घेतल्यानंतर ते वाढतच गेले. त्यामुळे पूर्वीचे कर्ज भरण्यासाठी आणखी कर्ज घेतले. २००६ पूर्वी पायाभूत सुविधांवर पैसे लावणे फायदेशीर होते. त्याकाळात स्टेट बँक ऑफ इंडिया  आणि आयडीबीआय  या बँकांनी सढळ हाताने कर्ज दिली. बँकांनी अधिक आशावादी होणे घातक ठरले. कर्ज देताना सावधगिरी बाळगली नाही, असे रघुराम राजन म्हणाले.