वाजपेयीविषयीच्या ट्विटबद्द्ल  त्रिपुराच्या राज्यपालांनी मागितली माफी

588

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली आहे. दिल्लीमधील एम्स रुग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास राजकीय नेत्यांची रीघ लागलेली आहे. दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना चिंता लागली आहे. मात्र, त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी कोणतीही अधिकृत माहिती न घेताच ट्विट करत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नंतर आपली चूक लक्षात येताच त्यांनी ट्विट करत माफी मागितली आहे.

तथागत रॉय यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की,  भारताचे माजी पंतप्रधान, एक उत्तम वक्ता आणि सहा दशकांपासून भारतीय राजकारणातील एक चमकता तारा, डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे खासगी सचिव म्हणून सुरुवात करणारे, बुद्धिमान, विनम्र अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले आहे. ओम शांती’. तथागत रॉय यांच्या या ट्विटवरुन लोकांनी त्यांच्यावर टीका करत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

त्यानंतर  तथागत रॉय यांनी ट्विट डिलीट करत माफी मागितली. रॉय यांनी पुन्हा ट्विट करत ‘मला माफ करा. मी टीव्ही रिपोर्टच्या आधारे ट्विट केले होते. मी ते वृत्त खरं मानले. आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मी माझे ट्विट डिलीट केले आहे. पुन्हा एकदा माफ करा’, असे म्हटले आहे.