वाजपेयीजींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला एक वर्षाची कोठडी

3134

औरंगाबाद, दि. २३ (पीसीबी) – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा औरंगाबाद महापालिकेतील एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याला एक वर्षाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन औरंगाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मतीन याच्यावर बेकायदेशीर जमाव जमविणे, जाळपोळ करून नुकसान पोहोचविणे, मनुष्यहानी होईल असे धोकादायक कृत्य करणे, जाणीवपूर्वक नुकसान पोहोचविणे, लोकसेवकांवर हल्ला करणे, आदेशाचे उल्लंघन करणे, सरकारी कामात अडथळा, दोन जमातींत तेढ निर्माण करणे, असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध दर्शवला.  यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.   त्यानंतर बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्णाण झाले होते. यामुळे औरंगाबाद पोलिसांनी कारवाई करुन मतीन याची एका वर्षासाठी हर्सुल येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.