वाकड येथील कॉर्पोरेट ट्रेनर महिलेला सव्वा लाखांचा गंडा

229

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – वाकड येथील एका कॉर्पोरेट ट्रेनर महिलेच्या नावावर परस्पर दिल्लीतील एका बँकेत ऑनलाईन पध्तीने बनावट खाते उघडून तिच्या मूळ बँक खात्यातून तब्बल १ लाख २२ हजार ४०० रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने परस्पर वळवून घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुधवार (दि.२९ ऑगस्ट) घडला.

अर्चना इंदरलाल जैसवाल (वय ४१, रा. धनराज पार्क, वाकड. मूळ रा. गौतमनगर, नवी दिल्ली) असे गंडा घालण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.  याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना वाकड परिसरात फ्रीलान्स कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करतात. त्यांचे ऍक्सिस बँकेमध्ये मूळ खाते आहे. बुधवारी अज्ञात इसमाने त्यांच्या नावाने बाराखंबा रोड, नवी दिल्ली मधील आय डी एस सी बँकेत बनावट खाते उघडून  त्या खात्यावर अर्चना यांच्या मूळ ऍक्सिस बँकेच्या खात्यातून ९५ हजार ४०० रुपये वाळवून घेतले. तसेच २७ हजार रुपये ई पेमेंट सर्व्हिसेस पेमेंट गेट वे द्वारे काढले असे एकूण १ लाख २२ हजार ४०० रुपये अज्ञात इसमाने काढून घेऊन अर्चना यांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश केगार आरोपींचा शोध घेत आहेत.