वाकड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ३८ तोळे सोने लंपास करणाऱ्या सराईताचे सीसीटीव्ही फुटेज जाहिर

973

चिंचवड, दि. १० (पीसीबी) –  वाकड येथील उच्चभ्रव गृहसंस्थेत एका सराईत चोरट्याने तब्बल ३८ तोळे सोन्याचे दागिने लंपास करुन पसार झाला आहे. हा सराईत चोर खुपच चालाक आहे. तो बऱ्याच दिवसांपासून फरार असून पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले नाही. पोलिसांनी चोरी झालेल्या गृहसंस्थेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटा दिसून येत आहे. पोलिसांनी हे फुटेज समाजमाध्यमांमधून नागरिकांपर्यंत पोहोचवले असून या चोरट्याला कोणी ओळखत असेल तर तातडीने पोलिसांना त्याची माहिती द्यावी, असे आवाहन वाकड पोलिसांनी केले आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड हद्दीत घरफोडी करणारा संशयित चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. चोरी करतानाचे त्याचे फुटेज नसले तरी सोसायटीच्या आवारात जाताना, लिफटमधून खाली येत असताना,रस्त्यावर आल्यानंतर संशयितरित्या वावरताना तो दिसून येत आहे. त्यानेच ३८ तोळे दागिने पळविले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचा व्हिडीओ पोलिसांनी नागरिकांच्या विविध व्हॉटसअॅप ग्रुपवर पाठवला आहे. या सराईत चोरट्याविषयी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी त्वरीत वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरिश माने यांच्याशी संपर्क साधावा,  असे आवाहन करण्यात आले आहे.