वाकडमध्ये वेल्डर असल्याचे नाटक करुन विकत होता पिस्तूल; सराईतास अटक

807

वाकड, दि. ११ (पीसीबी) – वेल्डर काम करत असल्याचे नाटक करुन पिस्तूल विकणाऱ्या एका रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगाराकडून वाकड पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल जप्त करुन त्याला अटक केली.

सुनील वसंत सोळेस (वय २८, रा. पुनावळे, माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अवैधरित्या पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस गस्त घालत असताना. पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून पुनावळे येथील स्वागत वॉशिंग सेंटर येथे एक तरुण पिस्तुलाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुनील याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल जप्त करुन सुनील याला अटक केली. सुनील हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, जोरजबरदस्ती करणे, धमकी देणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे तो अटक केलेल्या ठिकाणी वेल्डरचे काम करत असल्याचे भासवून पिस्तूल विकत होता. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.