वाकडमध्ये दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू

155

वाकड, दि. १९ (पीसीबी) – एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला मागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे समोरील ट्रकमधील ट्रकचालकाच्या बाजुला बसलेल्या चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.१८) सकाळी सहाच्या सुमारास वाकड ब्रीजखाली मुंबई-बँगलोर हायवेवर घडली.

मध्यालअप्पा शरणाप्पा बिसनाळे (वय ४४, रा. सांगलीवाडी ता. मिरज. जि. सांगली) असे मयत ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक विजयकुमार शांतीनाथ शेटे (वय ३९, रा. वाटेगाव, ता. वाळवी, जि. सांगली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रकचालक दिलीप तुकाराम कांबळे (वय २८, रा. सांगलीवाडी ता. मिरज) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास वाकड ब्रीजखालील मुंबई-बँगलोर हायवेवरुन फिर्यादी विजयकुमार शेटे हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच/१०/एडब्ल्यू/७९०१) घेऊन चालले होते. यावेळी त्याच्या शेजारी त्यांचे सहकारी चालक मध्यालअप्पा बिसनाळे बसले होते. इतक्या मागून ट्रक (क्र. एमएच/०९/सीए/५२०) घेऊन येणाऱ्या दिलीप याने विजयकुमार याच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये मध्यालअप्पा यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर अपघात होताच दिलीप हा फरार झाला. याप्रकरणी दिलीप विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करत आहेत.