वाकडमध्ये दोघा अट्टल चोरट्यांना ११ दुचाक्यांसह अटक

124

वाकड, दि. २६ (पीसीबी) – दुचाकी चोरणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून २ लाख २१ हजारा रुपये किमतीच्या तब्बल ११ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील सहा, हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी एमआयडीसी, देहूरोड, तळेगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत.

राहुल अंकुश क्षीरसागर (वय १९, रा. कामशेत) आणि अक्षय दशरथ शिंदे (वय २०, रा. चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्यातील टीम क्रमांक १५ आणि टीम क्रमांक १६ वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी डांगे चौकातून थेरगावच्या बाजूला एका दुचाकीवर दोघेजण संशयितरीत्या जाताना दिसले. त्यावरून १५ नंबर टीमने १६ नंबर टीमला कळवले. १६ नंबर टीमने त्यांना थेरगाव येथे पकडले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेत वाकड पोलिस ठाण्यात आणले.पोलीस ठाण्यात चौकशी करत असताना ताब्यात घेतलेले दोघेजण वापरत असलेली दुचाकी चोरीची असून तिचा नंबर बदलून ते वापरत असल्याचे समोर आले. यावर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मौजमजेसाठी शहर परिसरातून तब्बल ११ दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. वाकड पोलिसांनी दोघांना अटक करुन २ लाख २१ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाक्या जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, साहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्‍वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, विकास मडके, पोलीस कर्मचारी अनिल महाजन, रजनीकांत कोळी, सुनील काटे, सेलूकर, सनी गोंधळे, विशाल ओव्हाळ, जावेद मुजावर, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले, विक्रम जगदाळे, विजय गंभीरे, नितीन गेंगजे, सुरज सुतार यांच्या पथकाने केली.