वाकडमध्ये चालू कारने पेट घेतल्याने महिलेचा होरपळून मृत्यू

169

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – महिलेला ह्यदयविकाराचा झटका आल्याने तिला कारमधून रुग्णालयात नेत असताना कारला अचानकपणे लागलेल्या आगीमुळे महिलेचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.९) मध्यरात्री एकच्या सुमारास वाकड जकात नाक्याजवळ घडली.

संगीता मनीष हिवाळे ( वय ४४, रा. नखाते वस्ती, काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मनिष हिवाळे असे जखमी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास मनिष हिवाळे यांची पत्नी संगीता यांना ह्यदयविकाराचा झटका आला होता. यामुळे मनिष यांनी त्यांच्या (एमएच/१४/एएन/३७०९) या कारमध्ये पत्नी संगीता यांना वाकड येथील चांदव रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा सायमन, आई, आणि भाचा हे देखील होते. मात्र चांदव रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होऊ शकत नसल्याने ते संगीता यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात होते. यावेळी वाकड जकात नाक्याजवळ येताच त्यांच्या कारने पेट घेतला. यावर मनिष यांनी तातडीने मुलगा सायमन, आई आणि भाच्याला कारबाहेर काढले. यादरम्यान कारने जास्त पेट घेतला आणि संगिता यांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.  हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.