वाकडमध्ये घरकाम करणाऱ्या मोलकरणीला सव्वा लाखांच्या दागिन्यांसह काही तासातच अटक

63

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – घरकाम करणाऱ्या एका मोलकरणीला मालकाच्या घरातील तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्या प्रकरणी काही तासातच अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ७) वाकड परिसरात करण्यात आली.

शिल्पा सुहास चव्हाण असे दागिने चोरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव आहे. याप्रकरणी सनी मोहनलाल अचरा (रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी अचरा यांचे वाकड येथे घर आहे. आरोपी शिल्पा या त्यांच्याकडे घरकाम करतात. गेल्या काही दिवसांपासून सनी यांची आई आजारी असल्याने सनी आणि त्यांचे वडील रुग्णालयात असतात. यामुळे घरकाम करण्यासाठी सनी यांनी त्यांच्या घराची चावी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कविता शर्मा यांच्याकडे दिली होते. जेनेकरुन शिल्पा ही काम करुन जाईल, गुरुवारी आरोपी महिला ही सनी यांच्या घरी आली. तिने घरकाम करत असताना घरातील कपाटातून ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या आणि ४ हजार ७०० रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख २४ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. रात्री सनी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर मोठ्या शिताफीने वाकड पोलिसांनी काही तासातच चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला. घरकाम करणारी मोलकरीण शिल्पा चव्हाण हीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, तपास पथकातील पोलीस कर्मचारी अश्विनी शिंदे, शाम बाबा, नितीन गेंगजे, अशोक दुधवणे, विक्रांत गायकवाड, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीर, मधुकर चव्हाण, बिभीषण कन्हेरकर, अनिल महाजन, सनी जोंधळे, महंमद नदाफ, धनराज किरनाळे, दादा पवार यांच्या पथकाने केली आहे.