वशिलेबाजीसाठी मला राजकारण्यांचे, नातेवाईकांचे फोन यायचे- एकता कपूर

370

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – एकता कपूर मालिकांची क्वीन म्हणून ओळखली जाते. एकताच्या मालिका या नेहमीच छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवतात. स्मृती इराणींपासून मोनी रॉयपर्यंत अनेक नव्या चेहऱ्यांना एकतानं ब्रेक दिला. मात्र अनेकदा आपल्याकडे वशिलेबाजीसाठीही फोन यायचे असे तिने मुलाखतीत उघड केले आहे.

‘नवी मालिका येणार म्हटल्यावर आपल्या नातेवाईक किंवा मुलांना काम द्या अशी वशिलेबाजी करणारे अनेक फोन मला यायचे आणि येतातही. यात इण्डस्ट्रीतले काही प्रस्थापित लोक, राजकारणी खुद्द माझ्या नातेवाईकांचाही समावेश होता. मी मात्र कधीही अशा वशिलेबाजीला भीक घातली नाही’ असे एकता म्हणाली.  तुम्ही स्टार किड असाल किंवा सोशल मीडियावरील प्रसिद्ध सेलिब्रिटी असाल माझ्या लेखी त्याला किंमत नाही. मी अशा गोष्टीला महत्त्व देत नाही. मालिका असो किंवा चित्रपट ऑडिशनच्यावेळी जो कोणी चांगला अभिनय करेल आणि ज्याचं व्यक्तिमत्त्व त्या भूमिकेसाठी योग्य असेल अशाच व्यक्तींना मी प्राधान्य देते असं एकता म्हणाली.

काही नवोदित कलाकारांचे इण्डस्ट्रीतल्या प्रस्थापित लोकांशी नाते असते त्यामुळे त्या नात्याचा आधार घेत काम मिळवण्याचा प्रयत्न करतात पण अशानां मी स्पष्ट शब्दात नकार देते. वशिलेबाजीपेक्षा त्या व्यक्तीचे काम माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे वाटते. कितीतरी फोन रोज येत असतात, पण वशिलेबाजीपेक्षा चांगल्या कलाकारांना संधी द्यायला मला आवडते आणि यालाच मी प्राधान्य देते असे एकता लैला मजनू या तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी म्हणाली.