वरूणराजाच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत स्वागत  

105

निगडी, दि. २५ (पीसीबी) –  जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखीचे आज (मंगळवार) दुपारी चारच्या सुमारास   निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आगमन झाले.  तुकोबांच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.  वरूणराजानेही पालखींवर जलाभिषेक केला. भक्तीरसात चिंब झालेली वारकरी पावसात नाहून निघाले. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या वतीने  ३५० दिंडीप्रमुखांना मृदंग भेट देण्यात आले.   

महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या  स्वागत कक्षात  पिंपरी-चिंचवड शहर भाजपाध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर  राहुल जाधव,  सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर,   स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे,  नगरसेविका आशा धायगुडे- शेंडगे,  सुजाता पालांडे, पिंपरी-चिंचवड शहर भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

येथील भक्ती-शक्ती चौकात  तुकोबांच्या पालखीच्या दर्शनासाठी शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक जमले होते.  सालाबाद प्रमाणे पालखीचा पहिला मुक्काम हा आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात असेल.   आकुर्डीतील मुक्कामानंतर  बुधवारी सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. महापालिकेच्यावतीने पालखीतळावर वारकऱ्यांच्या विश्रांतीची सोय, तसेच भाविकांना पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी विषेश व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात आले असून पोलिसांसह पोलीस मित्रांनी वाहतुक नियमन केले. तसेच पालखी मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असून सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. महापालिका आणि विविध सेवा भावी संस्थांनी ठिकठिकाणी मोफत वैदकीय सेवा, वारकऱ्यांची राहण्याची सोय, जेवण, पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे.  तसेच विविध संस्था, संघटनांनी पालखीचे जागोजागी स्वागत केले. त्याचप्रमाणे वारकऱ्यांना विविध वस्तूंचे वाटपही केले.

दरम्यान, बुधवार (दि.२६) पालखी पिंपरीतील एचए कॉलनीत पहिली विश्रांती घेईल. दुपारच्या दरम्यान कासारवाडी येथे दुसरी विश्रांती, दुपारच्या जेवनासाठी दापोडी येथे थांबेल. आणि त्यानंतर शिवाजीनगरकडे प्रस्थान करेल.