‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला काँग्रेसचा कडाडून विरोध

283

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या धोरणाला  काँग्रेसने  कडाडून विरोध  दर्शवला आहे. ‘देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे, हे भारतीय संघराज्याविरोधी आहे,’ असे काँग्रेसने विधी आयोगासमोर म्हटले  आहे.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदंबरम, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी शुक्रवारी विधी आयोगाची भेट घेतली. यावेळी त्यांनी  ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर काँग्रेसची भूमिका विषद केली. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास आमचा कडाडून विरोध आहे . ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही संकल्पना भारतीय संघराज्याच्या चौकटीविरोधातील आहे,  असे काँग्रेसने म्हटले.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पनेत काहीच दम नसून हा केवळ एक जुमला आहे. लोकांना मुर्ख बनविण्याचा हा प्रकार आहे. एकत्र निवडणुका घेणे हे ऐकायला बरे वाटत आहे. मात्र, त्यामागील हेतू स्वच्छ  नाही. लोकशाहीची   मुल्ये पायदळी तुडवणारा  हा प्रस्ताव आहे. ही संकल्पना जनतेच्या विरोधी आहे. त्यामागे हुकूमशाही प्रवृत्तीचा दर्प आहे, अशी टीका सिंघवी यांनी केली.

दरम्यान,  वन नेशन, वन इलेक्शन संकल्पनेमुळे निवडणूक खर्चात कपात होणार आहे. त्यामुळे ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संकल्पनेला समाजवादी पार्टीसह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.