‘वन नेशन, वन इलेक्शन’ला रजनीकांत यांचा पाठिंबा

28

बंगळुरू, दि. १५ (पीसीबी) – समाजवादी पार्टी आणि जेडीयूपाठोपाठ आता दाक्षिणात्य सुपरस्टार, अभिनेता रजनीकांत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या धोरणामुळे वेळ आणि पैशाची बचत होणार असल्याचा दावा रजनीकांत यांनी केला आहे.

बेंगळुरू येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रजनीकांत आले होते. यावेळी त्यांनी मोदींच्या या भूमिकेचे समर्थन केले. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही संकल्पना मस्त आणि खूप चांगली आहे. त्यामुळे वेळ वाचेल. पैसा वाचेल. या संकल्पनेवर सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे,’ असे रजनीकांत म्हणाले.

देशाच्या विकासासाठी आठ पदरी मार्गांसारख्या प्रकल्पांची गरज असल्याचे सांगतानाच इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूतील शिक्षण व्यवस्था खूपच चांगली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तामिळनाडू सर्वाधिक भ्रष्ट असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर रजनीकांत यांना विचारले असता, ‘हा शहांचा दृष्टीकोण आहे. मीडियाने त्याबाबत त्यांनाच विचारले पाहिजे,’ असे रजनीकांत म्हणाले.