वनवासी विद्यार्थी वसतिगृह; राजगुरूनगरसाठी अन्नधान्याची मदत

79

पिंपरी, दि.१७ (पीसीबी) : दिनांक १७ नोव्हेंबर – पिंपरी येथील डेनफॉस या कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकीच्या भुमिकेतून राजगुरूनगर येथील वनवासी विद्यार्थी वसतीगृहातील मुलांसाठी एक महिन्याचे अन्नधान्य दिले. यामध्ये तांदुळ, गहु, साखर, डाळी, मसाले इ. ५०० किलो व चार तेलाच्या डब्यांचा समावेश आहे. याशिवाय टुथपेस्ट, ब्रश, साबण, कोल्ड क्रिम व खोबरेल तेल अशा आवश्यक साहित्याचे प्रत्येक मुलांकरीता एक याप्रमाणे स्वच्छता किट दिले.

यावेळी कंपनीचे अधिकारी प्रसन्नकुमार, कविता कालिकर, ज्योतिर्मयी गावसकर, विनोद पटोडिया, प्रशांत श्रीपन्नावार व वसतीगृहाचे पालक दिलीप देशपांडे आदि उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे पदाधिकारी भास्कर रिकामे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “शिक्षणाची इच्छा शक्ती असलेल्या परंतु आर्थिक क्षमता व सुविधा नसलेल्या वनवासी मुलांना या वसतीगृहामध्ये सकस आहार, उत्तम प्रकारचे शिक्षण व संस्कार दिले जातात. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पन्नास वर्षे हे वसतिगृह सुरु असून हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.”

डेनफॉस कंपनीचे अधिकारी यांनी यावेळी सदर धान्य योग्य संस्थेला देण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल उपस्थितीतांचे आभार मानले. तसेच यापुढे नियमितपणे मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.
वसतीगृहाचे पालक दिलीप देशपांडे यांनी कंपनीच्या समन्वयीका निवेदिता जाधव व सावरकर मंडळाचे भास्कर रिकामे यांचे विशेष आभार मानून अन्नधान्य स्विकारले.