वंचित आघाडीला धक्का; भारिपचे माजी सरचिटणीस मिलिंद पखालेंचा राजीनामा

136

नागपूर, दि. १८ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मदत करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत काम केले आहे, असा आरोप करून भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांनी कार्यकर्त्यांसह राजीनामा दिला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालपूर्वीच  वंचित बहुजन आघाडीला धक्का बसला आहे.

आंबेडकरी समाजाला काही वेगळे वळण मिळेल म्हणून १२ वर्षांपूर्वी भारिप बहुजन महासंघात दाखल होऊन प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारले होते. मात्र, आजची भारिप केवळ सत्ता संपादनाचे खोटे स्वप्न दाखवत आहे, असेही मिलिंद पखाले यांनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नाही. याउलट वंचितमुळे ७ ते ८ ठिकाणी भाजपला विजय मिळण्यास मदत होईल. वंचित आघाडीच्या ९९ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावाही  पखाले यांनी केला आहे.

वंचित आघाडीच्या अपयशात आम्ही वाटेकरी ठरु नये, यासाठी निवडणुकीच्या निकाल लागण्याआधीच आम्ही राजीनामा दिला आहे, असे  पखाले यांनी सांगितले.  मिलिंद पखाले यांच्यासह पूर्व विदर्भातील भारिप बहुजन महासंघाच्या सुमारे २० जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी देखील  राजीनामा दिला आहे.