वंचितने एमआयएमसाठी दरवाजे कधीच बंद केलेले नाहीत, दरवाजे अद्यापही खुले – प्रकाश आंबेडकर

69

पुणे, दि. २३ (पीसीबी) –  एमआयएमसाठी वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे कधीच बंद केलेले नाहीत, दरवाजे अद्यापही खुले आहेत असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एमआयएम संविधानाची शपथ घेऊन काम करते त्यामुळे आम्ही एमआयएमला धर्मनिरपेक्ष मानतो. एमआयएमसाठी आम्ही दरवाजे कधीच बंद केलेले नाहीत. त्यांनी दरवाजे बंद केलेत आणि त्यांनीच दरवाज्याला टाळे लावले आहेत. त्याची चावी त्यांच्याकडेच आहे. एमआयएमसोबत आमच्या समितीची बोलणी सुरु आहेत. ती व्यवस्थित झाली तर सगळे व्यवस्थित होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

दरम्यान १० सप्टेंबरला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीवंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. इम्तियाज जलील यांनी घेतलेली भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केले आहे.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी एमआयएम आणि वंचितच्या युतीबाबत भाष्य करत नाहीत, तोपर्यंत आमची युती कायम असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. मात्र आता ओवेसी यांनीच पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने वंचित आणि एमआयएम विधानसभा निवडणूक वेगवेगळे लढणार यावर शिक्कामोर्तब झाले होते.