लोणी काळभोरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नी, मेहुणा आणि मुलावर चाकूने वार; मुलाचा दुर्देवी मृत्यू

150

पुणे, दि. १४ (पीसीबी) – लोणी काळभोर येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी, सहा वर्षीय मुलगा आणि मेहुण्यावर चाकूने प्राणघातक वार केले. त्यानंतर स्वतःवरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सहा वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.

आयुष बसेरे असे मृत सहा वर्षीय मुलाचे नाव आहे. तर आरोपी पती योगेश बसेरे, पत्नी गौरी बसेरे, मेहुणा भारत उत्तम शिरोळे हे तिघे गंभीर जखमी आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरातील पठारे वस्ती येथे गौरी बसेरे यांचे पती सोबत भांडण झाल्याने भावाकडे राहण्यास आल्या होत्या. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास योगेश हा पत्नीला भेटण्यास आला. त्यानंतर काही वेळाने दोघांमध्ये भांडण झाले. त्याच वेळी आरोपी योगेश याने त्याच्या जवळील चाकूने पत्नीवर वार करण्यास सुरुवात केली. तो आवाज ऐकून गौरी यांचा भाऊ हा भांडण सोडविण्यासाठी गेल्यावर त्याच्यावर देखील त्याने वार केले. तेव्हा बाजूला असणार्‍या आयुष या सहा वर्षाच्या मुलावर देखील त्याने वार केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची झाला.

या घटनेनंतर आरोपी योगेश याने स्वतःवरही वार केले. या सर्व प्रकारानंतर तिनही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच योगेश हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने सतत भांडणे होत होती. यामधून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करत आहेत.