लोणावळ्यात भुशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; तुंग किल्ल्यावरुन ट्रेंकिंग करताना खाली पडून युवतीचा मृत्यू

52

लोणावळा, दि. १६ (पीसीबी) – लोणावळ्याच्या भुशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू झाला तर तुंग किल्ल्यावर ट्रेंकिंग करत असताना खोली पडून सोळा वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास घडल्या.

राजू शेख (वय २०) असे भुशी धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर इशिता माटे (वय १६, रा. पुणे) अस तुंग किल्ल्यावरून ट्रेकिंग करत असताना शंभर ते दीडशे फूट खोल खाली पडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. भुशी धरणातील मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमने काढला असून तुंग किल्याच्या घटनास्थळी लोणावळा पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावसाचा आनंद घेण्यासाठी राजू आणि त्याचे काही मित्र हे लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात आले होते. धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावर ते चढले होते. मात्र राजूचा पाय घसरल्याने तो थेट भुशी धरणात पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत इशिता ही युवती पगमार्क या १७ जणांच्या पथकासोबत ट्रेकिंगसाठी लोणावळ्यातील तुंग किल्ल्यावर गेली होती. यावेळी ट्रेकिंग करत असताना शंभर ते दीडशे फुटांवरून ती थेट खाली पडली. यात तिचा मृत्यू झाला. लोणावळा ग्रामिण पोलिस तपास करत आहेत.