लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: तीन दिवसात 6 गावठी हातभट्टयांवर कारवाई करत तब्बल ‘एवढ्या’ लाखांचे कच्चे रसायन नष्ट

109

लोणावळा, दि.०१ (पीसीबी) : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मागील तीन दिवसात करंडोली, औंढे, कुसगाव, शिळिंब, काले या गावांमधील 6 गावठी हातभट्टयांवर धडक कारवाया करत 4 लाख 80 हजार रुपयांचे कच्चे रसायन नष्ट केले. तर 3 हजार रुपये किंमतीचा 50 लिटर तयार हातभट्टी माल जप्त केला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील काही गावांमध्ये गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक पदाचा पदभार घेताच पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या कारवाया केल्या आहे. भादंवी कलम 328, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ख)(ड) अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या.

औंढे येथील कारवाईत अक्षय संग्रामसिंग राजपुत (वय 31, रा. औंढोली, ता. मावळ, जिल्हा पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत 7 हजार 400 लिटर गावठी हातभट्टी असलेले बॅरल नष्ट केले. सदर ठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी अशुद्ध पाणी, त्यामध्ये विविध झाडांच्या मुळ्या, काळा गुळ, नवसागर असे टाकून रसायन तयार केले जात होते. या विषारी रसायनामुळे मानवी जिवितास धोका निर्माण होऊ शकतो,याची माहिती असताना देखील त्यापासून आंबट उग्र वास असलेली गावठी हातभट्टी दारू बेकायदेशीरपणे बनविताना मिळून आला आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बनकर पुढील तपास करत आहेत.

WhatsAppShare