लोक झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी- बच्चू कडू

287

मुंबई, दि.२९ (पीसीबी)- ‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. मात्र प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी उद्धव यांना शुभेच्छा देताना राज्याचे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला आहे.

सलग चौथ्यांदा अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून बच्चू कडू आमदार म्हणून निवडूण आले आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला. महिनाभर सुरु असलेल्या सत्तानाट्यामध्ये बच्चू कडू हे अनेकदा शिवसेना आमदारांच्या बैठकीला मातोश्रीवर उपस्थित राहिले होते. गुरुवारी शिवतिर्थावर पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यालाही ते आवर्जून उपस्थित होते. याच सोहळ्यातील काही फोटो ट्विटवर पोस्ट करत त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. “लोक झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी!, जय महाराष्ट्र” असं ट्विट बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन केले आहे.

 

WhatsAppShare