‘लोकांनी गोमांस खाणे बंद केले, तर मॉब लिंचिंग थांबेल’; राष्ट्रीय स्वयंसेवक चे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य

96

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार म्हणाले आहेत की, जर लोकांनी बीफ खाणे बंद केले, तर देशात मॉब लिंचिंग होणार नाही. राजस्थानच्या अलवरमध्ये गोतस्करीच्या आरोपात झालेली रकबर खानच्या हत्येवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात इंद्रेश कुमारांनी हे वक्तव्य केले आहे.

मुस्लिमांमध्ये काम करणारी आरएसएसची संघटना राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी असेही म्हटले की, मॉब लिंचिंगचे स्वागत केले जाऊ शकत नाही. परंतु जर लोकांनी गायीचे मांस खाणे बंद केले, तर असे गुन्हे थांबतील.

ते म्हणाले की, जगातील असा कोणताही धर्म नाही, जो गोहत्येला परवानगी देतो. इंद्रेश कुमार यांनी दावा केला की, इस्लामपासून ते ख्रिश्चन धर्मापर्यंत गोहत्येला थारा नाही.

इंद्रेश कुमार यांच्याशिवाय भाजप नेते विनय कटियार यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांनी गायीला स्पर्श करण्याआधी अनेक वेळा विचार करावा. हा या देशातील कोट्यवधी जनतेच्या भावनेचा प्रश्न आहे.

अलवरच्या रामगढ परिसरात २० जुलैच्या रात्री उशिरा काही जणांनी गोतस्करीच्या संशयावरून रकबर खानला बेदम मारहाण केली होती. यानंतर पोलिस रकबरला पोलिस स्टेशनला घेऊन गेले. आरोप आहे की, पोलिसांनी रकबरला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी सर्व गायींना गोशाळेत सोडले. त्यांनी रकबरला हॉस्पिटलला नेण्यामध्ये खूप उशीरही केला. यामुळे उपचाराविना रकबरचा मृत्यू झाला.

राजस्‍थान सरकारने आपली बेजबाबदारी कबूल केली आहे. याप्रकरणी ५ पोलिस कर्मचाऱ्यांना शिक्षा देण्यात आली आहे. याअंतर्गत इंचार्ज इंस्पेक्टर सुभाष शर्माला निलंबित करण्यात आले, तर एएसआय मोहन चौधरीची बदली करण्यात आली आहे. याशिवाय त्या वेळी ड्यूटीवर हजर असलेल्या आणखी ३ पोलिसांचीही बदली करण्यात आली आहे.