लोकांनी इंदिरा गांधी यांचाही पराभव केला होता…

125

पुरंदर, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतात आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच लोक आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात, असंही नमूद केलं. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचं उदाहरणही दिलं. ते गुरुवारी (१२ मे) पुरंदर (पुणे) येथे पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “भारताची जमेची बाजू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना. आपण स्वतंत्र झाल्यानंतर १९५० मध्ये आपल्याकडे घटना आली. या घटनेने देशाला एकसंघ ठेवलं ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल. दुसरीकडे श्रीलंकेत पाहिलं तर त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांच्या हातातील सत्ता गेल्यासारखी आहे. लोक रस्त्यावर आहेत. श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानमध्ये स्थिती आहे. तेथेही पंतप्रधानांना काढून टाकण्यात आलं. भुट्टो जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांची हत्या झाली. अनेकांची उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील.”
“अनेक देशांमध्ये संविधानाची भक्कम चौकट नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकशाही सतत संकटात जाते. आपल्याकडे लोकशाही संकटात जात नाही त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवार पुढे म्हणाले, “दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात आणखी एक गोष्ट चांगली आहे. भारतात आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे. तो शहाणपणाने निकाल देतो. त्याचं उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांनी आणीबाणीसारखा निर्णय घेतला तेव्हा लोकशाहीवर संकट आल्याचं लोकांना वाटलं. लोकांनी इंदिरा गांधी यांचाही पराभव केला. राज्य हातातून काढून घेतलं. त्यावेळी मोरारजी भाई, अटलबिहारी वाजपेयी या सगळ्यांच्या हातात राज्य दिलं.”