लोकसभेचे बिगूल वाजले; महाराष्ट्रात ११, १८, २३, २९ एप्रिलला मतदान, २३ मे रोजी मतमोजणी

173

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ४ टप्प्यामध्ये मतदान घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदा देशभरात  ७ टप्प्यात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे, तर मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे, अशी माहिती   केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिली.

विद्यमान लोकसभेचा कार्यकाल ३ जूनला संपणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची      घोषणा  अरोरा यांनी यावेळी केली.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.  त्यानुसार पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी महाराष्ट्रात ७ जागांसाठी, दुसऱ्या टप्यात १८  एप्रिल रोजी १०  जागांसाठी,  तिसऱ्या टप्यात २३  एप्रिल १४ जागांसाठी तर चौथ्या टप्यात २९  एप्रिल रोजी १७  जागांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे.

दरम्यान, २०१४ च्या तुलनेत यंदा ७ कोटी मतदार वाढले आहेत. सतराव्या लोकसभेसाठी देशात एकूण ९० कोटी मतदार असून त्यातील १.५ कोटी मतदार हे १८-१९ वर्षांचे, तर १.६० कोटी मतदार नोकरदार आहेत. यंदा प्रथमच ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटमशीनचा वापर केला जाणार आहे.