लोकसभा-विधानसभा एकत्र झाल्यास राज्यात पुन्हा भाजपचे सरकार ?  

731

ठाणे, दि. ६ (पीसीबी) – ठाण्यात पार पडलेल्या ज्योतिष परिषदेत २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि  विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाकीत वर्तवण्यात आले आहे. २०१९ मध्ये केंद्रात कुणाचे सरकार येणार? राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती-आघाडी होणार का? अशा अनेक प्रश्नांवर ज्योतिषांनी भाकीत वर्तवले आहे.

ठाण्यात ब्राह्मण सभा मंडळ येथे रविवारी (दि.५ ) ज्योतिष अधिवेशन संपन्न झाले. यावेळी २०१९ च्या निवडणुका’ या सत्रात पुण्याचे सिद्धेशवर मारटकर यांनी अनेक राजकीय भाकीते वर्तवली.

मारटकर म्हणाले की, महाराष्ट्रातील सध्याचे असंतोषाचे वातावरण ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर ही परिस्थिती निवळून मार्चनंतर पूर्णपणे शांततेचे वातावरण असेल. २०१९ च्या लोकसभेत भाजपला बहुमत मिळणे कठीण आहे. त्यामुळे भाजपकडून मित्रपक्षांना एकत्र घेऊनच सत्ता स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. तर राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र झाली, तर भाजप पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर येईल, अन्यथा ऑक्टोबरमध्ये झाल्यास सत्ता पालट झाल्याचे दिसून येईल.

२०१९ च्या निवडणुकांसाठी पुन्हा एकदा काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी करून लढण्यास त्यांच्या मोठ्या संख्येने   जागा निवडून येतील. तर लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा युती करतील. मात्र विधानसभेसाठी ही युती होईल, असे वाटत नाही. तसेच लोकसभा-विधानसभा एकत्र झाल्या, तर भाजपची सत्ता पुन्हा एकदा राज्यात येईल. पण जर ऑक्टोबरमध्ये निवडणूक झाली तर सत्ता बदल होऊन काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते, असे मारटकर म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस हे पाच वर्षांचा कार्यकाळ सहज पूर्ण करतील. जर पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली तर त्यांना परत एकदा मुख्यमंत्री केले जाईल. किंवा मग त्यांना केंद्रात पाठवून चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री केले जाईल. कारण त्यांची पत्रिका स्ट्राँग आहे. भाजपची सत्ता आल्यास चंद्रकांतदादा पाटील, अन्यथा काँग्रेसची सत्ता आल्यास अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होतील.

२०१९ च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होतील, कारण त्यांच्या पत्रिकेत तो योग आहे. फक्त बहुमत न येता त्यांना मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल. देशाच्या राजकारणात एक विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचे नाव आहे. निवडणुकीतही काँग्रेसला एक मोठा पक्ष म्हणून प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा असेल. मात्र, त्यांचा पंतप्रधान होण्याचा योग यावेळी नाही.