लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठा शस्त्रसाठा जप्त; दोघांना अटक

173

पुणे, दि. १५ (पीसीबी) – सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरु आहे. उमेदवार नानापरिने विविध मार्गाचा अवलंब करुन मतदारांना आपल्या जाळ्यात ओडतात. यासर्व गोष्टींवर लक्ष ठेवून असलेल्या पुणे पोलिसांनी मध्यप्रदेशातुन तस्करी करून आणलेले ५ पिस्तुल आणि ९ जिवंत काडतुसांसह दोन सराईतांना अटक केली आहे. या हत्यारांची किंमत तब्बल १ लाख ५१ हजार ८०० रुपये असल्याचे बोलले जात आहे.

मनोज धोत्रे आणि मोहसीन उर्फ मोबा शेख असे हत्यारांसह अटक करण्यात आलेल्या दोघा सराईतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मनोज धोत्रे हा पिस्तूल विकण्यासाठी स्वारगेट परिसरातील कॅनल रोडवर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मनोज धोत्रे याला अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून १ पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ते पिस्तूल वाघोली येथील मोहसीन याच्याकडून आपल्याचे सांगितले. पोलिसांनी वाघोली येथे जाऊन मोहसीन याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली.

त्यानंतर मोहसीन याने पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेले ३ गावठी पिस्तूल व ६ जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी त्याला अटक करून केलेल्या अधिक चौकशीत हे पिस्तुल त्यांनी मध्यप्रदेशातून आणल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन पिस्तूल विक्री करणाऱ्याचा शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. दरम्यान मनोज धोत्रे याने आणखी २ गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे विश्रांतवाडी येथे घरात लपवून ठेवले होते. तेही पोलिसांनी जप्त केले. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. मनोज धोत्रे याच्यावर ४ गुन्हे तर मोहसीन उर्फ मोबा शेख याच्यावर ९ गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.