लोककला ही मातीत रूजलेली आहे म्हणून ती लोकांना आवडते. जीवनाचे तत्त्वज्ञान मांडण्याची ताकद लोककलावंतांमध्ये आहे. कलावंत डफावर थाप मारतो त्याप्रमाणे त्याच्या पाठीवरती थाप मारणे आवश्यक आहे. दाद दिल्याशिवाय कलावंत घडत नाही. त्यामुळे लोककलावंतांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी (दि. १३) केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक कलामंच यांच्या वतीने आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या सहकार्याने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर नितीन काळजे, संमेलनाचे मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, राही भिडे, प्रकाश खांडके, प्रविण गोळे, कार्यकारी अभियंता प्रविण तुपे आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, “लोककला ही मातीत रूजली आहे म्हणून ती लोकांना आवडते. मनाला लागले की ते जनात येते आणि जनाला आवडले की जी लोकांत येते त्यालाच लोककला म्हणतात. त्यामुळे जे अंतकरणातून येते ती लोककला असते. कलावंत डफावर थाप मारतो तसा त्याच्या पाठीवरती थाप मारणारा असावा लागतो. लोककलावंतांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. दाद दिल्याशिवाय कलावंत घडत नाही. जीवनाचे तत्वज्ञान मांडण्याची ताकद लोककलावंतांमध्ये आहे. जेवणामध्ये जसे मीठ चव आणते, तसे प्रत्येक माणसाच्या जीवनात चव आणण्यासाठी लोककला असली पाहिजे. पठ्ठे बापुराव आणि बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेली सुंदर स्वप्ने आहेत. पण ती स्वप्ने पहाटेची निघाली. पठ्ठे बापुरावांचे समग्र साहित्यांचे संग्रह व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”

संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड ही लाखो वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पावन झालेली भूमी आहे. लोककलाकार शरीराने जरी मनोरंजन करत असले, तरी मनाने ते प्रबोधन करत असतात. लोककलांच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. लोककलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभे केले पाहिजे. हे संमेलन पठ्ठे बापूरावांच्या नावाने भरवल्याचा आनंद होत आहे. पठ्ठे बापुरावांनी तमाशाला वेगळी ओळख मिळवून दिली, असेही ते म्हणाले.”

यावेळी जेष्ठ अभिनेत्री लीलाताई गांधी यांना जीवनगौरव व प्रभाकर मांडे यांना लोककला साहित्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच वसंत अवसरीकर, संजीवनी मुळे, पुरषोत्तम महाराज पाटील, बापूराव भोसले, मुरलीधर सुपेकर, सोपानजी खुडे, प्रतिक लोखंडे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.