लातूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

161

लातूर, दि. ८ (पीसीबी) –  मुलाला शिक्षण देऊनही नोकरी मिळत नाही, मुलगी एमएस्सीला विद्यापीठात दुसरी आली, तिलाही कुठे संधी मिळत नाही. त्यामुळे निराश झालेल्या लातूर जिल्ह्यातील माटेफळ येथील एका शिक्षकाने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली.

रमेश पाटील असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर तालुक्यातील माटेफळ येथील शिक्षक रमेश ज्ञानोबा पाटील हे निवळी येथील एका संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. एक मुलगी एमएसस्सी तर दुसऱ्या मुलीने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मुलगाही पदवीधर असून, तो सध्या स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. त्यांना दहा एकर शेती असून त्यावर राष्ट्रीयकृत बँक आणि सहाकारी बँकेचे ३ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज आहे. कर्जाची परतफेड होत नाही. आरक्षण नसल्याने मुलांनाही नोकरी मिळत नसल्याचे कारण मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाटील यांनी नमूद केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून, याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.