लाईट गेल्यावर वायर कापणारा मनसैनिक हवा – राज ठाकरे

683

धुळे, दि. २ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची धुळ्यामध्ये जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी चेहऱ्यावर येत असलेला लाईट बंद करायला सांगितला. परंतु मंचावर उपस्थित असणाऱ्या एका कार्यकर्त्याने चक्क वायरच कापून टाकली. त्यावर राज ठाकरेंनीही आपल्याला असाच मनसैनिक हवा,  असे म्हणत डोक्याला हात लावला.

मला असाच मनसैनिक अपेक्षित आहे, या विधानावर सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. औरंगाबादनंतर राज ठाकरेंनी आज (रविवार) धुळ्यातील मनसैनिकांशी संवाद साधला. याआधी खूप वर्षांपूर्वी धुळ्यात आलो होतो. मात्र, धुळे शहरात सुधारणांऐवजी बिघाडच अधिकच झाला आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे धुळ्याला पोहोचण्याआधी महामार्गावरुन जात असताना त्यांची गाडी वाहतूक पोलिसांनी थांबवली. अर्थात राज ठाकरेंच्या चालकाने सीटबेल्ट लावला होता. मात्र वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पोलिसांनी राज ठाकरेंना त्यांच्या उपक्रमाची माहिती दिली. राज ठाकरेंनीही त्याची माहिती घेत या उपक्रमाचे  कौतुक केले.