लाईटहाऊस प्रकल्पातून बेरोजगारांना मिळाला रोजगार!

34

पिंपरी,दि.21 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रकल्पाच्या माध्यमातून गरजूंच्या हाताला काम मिळत आहे. कोरोना महामारीच्या गेल्या दीड वर्षाच्या काळात तब्बल 450 मुलांना विविध कोर्सचे प्रशिक्षण दिले. त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. तर, सद्यस्थितीत 300 मुलांचे कोर्स सुरू असून 200 मुलांचे प्राथमिक कोर्स सुरू आहेत.

शहरातील झोपडपट्टी भागातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटी फाऊंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये मार्च 2021 मध्ये लाईटहाऊस प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पामध्ये ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्शियल आकाऊंटिंग विथ टॅली, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग, मोबाईल रिपेअरिंग, जावा, सॉफ्टवेअर टेस्टिंग, पायथॉन, क्‍लाऊड कंम्प्युटिंग, कंम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग ऍण्ड लॅपटॉप रिपेअरिंग, फॅशन डिझाईन, ब्युटी पार्लर, मेकअप आर्टिस्ट यासारखे विविध 90 कोर्सेस शिकविले जातात. गेल्या दीड वर्षांत 950 मुलांना मोफत प्रशिक्षणाचे काम सुरू आहे. यामधील 450 मुलांना विविध कोर्सचे प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे.

300 मुलांचे कोर्स सुरू असून 200 मुलांचे प्राथमिक कोर्स सुरू आहे. लाईटहाऊसमध्ये दर दोन महिन्यांनी जॉब फेअरचे आयोजन करण्यात येते. यामध्ये कौशल्य प्राप्त मुलांना रोजगार दिला जातो. कोरोनात विधवा झालेल्या 30 महिलांना लाईटहाऊसमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामधील आत्तापर्यंत 17 महिलांना रोजगार मिळवून दिला असून त्यांच्या त्यावर उदरनिर्वाह सुरू आहे. पिंपरीतील या प्रकल्पासाठी ऍटलास कॉपको कंपनीच्या सीएसआर फंडातून मदत केली जात असल्याची माहिती महापालिकेचे समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, पिंपरी लाईटहाऊस प्रकल्पाच्या मुख्य श्रुतिका मुंगी यांनी माहिती दिली. सध्या पिंपरी, निगडी येथे हे प्रकल्प सुरू झाले आहेत. तर चिंचवडमध्ये याचे काम सुरू असून भोसरी जागेसंदर्भात पाहणी झाल्याचेही इंदलकर यांनी सांगितले.