लांडेवाडीत दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

617

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – घर खर्चाला पैसे न देता, वारंवार मारहाण करुन मानसीक त्रास देणाऱ्या दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहीतेने राहत्या घराच्या छताला असलेल्या लोखंडी पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी सातच्या सुमारास भोसरीतील लांडेवाडी येथून उघडकीस आली.

छाया नागेश जानराव (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडिल गंगाधर बोचकुरे (वय ६०, रा.घोडकाराजुरी, बीड) यांनी पती नागेश चंदु जानराव (वय ३८, रा. लांडेवाडी वसाहत भोसरी) यांच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत छाया यांचा नागेश याच्या सोबत १४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्या पती नागेश आणि सासू सासऱ्यांसोबत लांडेवाडी येथे राहत होत्या. त्यांना गौरी (वय ११), जान्हवी (वय ९) आणि वैष्णवी (वय ३) अशा तीन मुली आहेत. सोमवारी रात्री नागेश हा दारु पिऊन आला होता. त्याने  स्वत:चे वयो वृध्द आईवडिल आणि छाया यांना शिवीगाळ करुन जबर मारहाण केली. या आगोदर देखील नागेशने  वृध्द आईवडिल आणि छायाला मानसिक व शारिरिक त्रास दिला होता. या त्रासाला कंटाळून छायाने घरातील छताच्या पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्ती केल्या प्रकरणी पती नागेश याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक व्हि.एस.साळुंखे तपास करत आहेत.