लस आली तरी कोरोना कायम

83

वॉशिंग्टन, दि. २७ (पीसीबी) : सगळ्या जगाचे लक्ष कोरोनाला रोखणाऱ्या लसीवर लागले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या विषाणूला अटकाव करणाऱ्या लसीवर संशोधन सुरू असून काही लस चाचणीच्या निर्णायक टप्प्यावर आली आहे. मात्र, लस विकसित झाली तरी कोरोनाची बाधा होणारच नाही, याची खात्री देता येणार नसल्याचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील सीएनएन या वृत्तवाहिनीसोबत बोलताना बिल गेट्स यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बिल गेट्स यांनी सांगितले की, या वर्षाखेर अथवा वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची लस उपलब्ध होईल. या लसीचे दोन फायदे होणार आहेत. एक तर कोरोनाच्या आजारापासून बचाव करेल आणि दुसरं म्हणजे
कोरोनाचा संसर्ग रोखला जाणार आहे. मात्र, लसीमुळे तुम्हाला कोरोनाची बाधा होणारच नाही, अशी खात्री देता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बिल यांनी सांगितले की, सध्या कोरोना प्रतिबंधक लसीची आवश्यकता आहे. अशावेळी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती, गरोदर महिलांवर चाचणी करण्यासाठी वेळ नाही. अशा परिस्थितीत योग्य, अचूक माहिती संकलित करणे हे कठीण काम आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर बिल गेट्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेतील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. बिल गेट्स यांनी सांगितले की, कोरोनाच्या महासाथीला रोखण्यासाठी चाचण्या वाढवाव्या लागणार आहेत. अनेक अमेरिकन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेत कोरोना चाचणी अधिक होत असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा व्हाइट हाउसचा दावा अयोग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बिल गेट्स यांच्या बिल अॅण्ड मिलिंडा गेटस फाउंडेशनच्यावतीने कोरोनाची लस विकसित करण्यासाठी ४० अब्ज डॉलर (जवळपास ३ लाख कोटी रुपये) खर्च करण्यात येणार आहे. अमेरिकेत कोरोनाचे थैमान सुरूच आहे. अमेरिकेत एकाच दिवसात सर्वाधिक ३७ हजार नवीन बाधित आढळले. एकाच दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर, २४३० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत २४ लाखांहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली.
दरम्यान, ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. आतापर्यंत ऑक्सफोर्डची लस या निर्णायक टप्प्यात आली आहे. तर, अमेरिकेतील मार्डना इंक या कंपनीची लस ही दुसऱ्या टप्प्यातील चाचणी करत आहे. चीनमधीलही काही कंपन्यांनी विकसित केलेली दुसऱ्या टप्प्यातील चाचणी घेत आहे.

WhatsAppShare