लवकरच भारत-पाकच्या पंतप्रधानांना भेटणार- ट्रम्प

86

वॉशिंग्टन, दि. १८ (पीसीबी) – येत्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटणार असून, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने खूप प्रगती झाली आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. ह्युस्टन येथे मोदी यांची अमेरिकी भारतीयांसमोर सभा होणार असून, त्यामध्ये ट्रम्पही उपस्थित राहणार आहेत, तर पुढील आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबरही त्यांची भेट होणार आहे.

मोदी आणि इम्रान खान २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसमोर भाषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी दोन्ही देशांतील तणाव कमी झाला असून, दोन्ही देशांच्या नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले. यावेळी काश्मीरच्या मुद्द्याचा उल्लेख न करता ते म्हणाले, ‘दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला असून, त्यामध्ये खूप प्रगती झाली आहे.’