लवकरच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार लोकल प्रवासाची परवानगी

16

मुंबई दि. २९ (पीसीबी) सर्वसामान्यांना अद्यापपर्यंत लोकल प्रवासाची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे उपनगरात आणि मुंबई लगतच्या ठाणे, डोंबिवली, कल्याण, विरार, पालघर या पट्टयातील नोकरदार वर्गाला दररोज मुंबई गाठताना अक्षरक्ष: नाकीनऊ येत आहेत. मुंबई गाठण्यासाठी अनेक तासांचा प्रवास करावा लागतोय. वाहतुकीची मर्यादीत साधने उपलब्ध असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

हीच बाब ध्यानात घेऊन, राज्य सरकार आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याच्या योजनेला अंतिम स्वरुप देत आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. सध्याच्याघडीला हे कर्मचारी स्वत:च्या खासगी वाहनाने, पूल कार, एसटी किंवा बेस्ट बसने प्रवास करत आहेत. राज्य सरकारने खासगी कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. पण खासागी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नाहीय. त्यामुळे या कर्मचारी वर्गाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय.

“खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता यावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. पण खासगी कार्यालयांकडून सुद्धा आपल्या कामाकाच्या वेळांमध्ये बदल अपेक्षित आहे” असे मदत आणि पूनर्वसन सचिव किशोर निंबाळकर म्हणाले. “कार्यालयीन कामकाजांच्यावेळात बदल झाला तर, लोकलमध्ये गर्दी कमी होईल. त्यानंतर आम्ही खासगी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देऊ शकतो” असे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी आहे. सध्या मुंबईत सरकारी कर्मचारी, हॉस्पिटल स्टाफ, बँक आणि विमा कर्मचाऱ्यांना ट्रेन प्रवासाची परवानगी आहे.

WhatsAppShare