लग्नास स्पष्ट होकार अथवा नकार दिला नाही म्हणून तरुणाची रेकॉर्डिंग करून आत्महत्या

106

हिंजवडी, दि. १० (पीसीबी) – मुलगी देऊ नये म्हणून मुलीच्या वडिलांना दोघांनी मुलाबद्दल वाईट साईट सांगितले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी मुलाला स्पष्ट होकार अथवा नकार दिला नाही. यावरून मुलाने मोबाईल फोनमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून आत्महत्या केली. ही घटना 24 एप्रिल रोजी सायंकाळी येळवंडे वस्ती, हिंजवडी येथील हॉटेल रॉयल येथे घडली.

लता पंजाब खराडे (वय 47, रा. काळाखडक, वाकड) याबाबत बुधवारी (दि. 9) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश विक्रम खराडे (वय 32), उमेश विक्रम खराडे (वय 34, दोघे रा. मारुंजी), तुकाराम खंडू उदमले (वय 51, रा. चोंढी, ता. जामखेड, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी तुकाराम उदमले यांची मुलगी यांचा विवाह करण्याचे नियोजित होते. मात्र तुकाराम यांनी त्यांची मुलगी फिर्यादी यांच्या मुलाला देऊ नये म्हणून आरोपी गणेश आणि उमेश या दोघांनी फिर्यादी यांचा मुलगा व्यसनी आहे. त्याची संगत चांगल्या मुलासोबत नाही. तो फालतू आहे, असे सांगून तुकाराम यांची दिशाभूल केली.

त्यामुळे तुकाराम यांनी फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता लग्नास स्पष्ट होकार अथवा नकार दिला नाही. फिर्यादी यांना फक्त आशेवर ठेवले. याच कारणावरून फिर्यादी यांच्या मुलाने 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रॉयल हॉटेल येथे आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी फिर्यादी यांच्या मुलाने मोबाईल फोन मध्ये ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवला. त्यामध्ये आरोपी व आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare