लग्नासाठी तब्बल २०० हेलिकॉप्टर; ८०० कर्मचारी

502

देहरादून, दि. ८ (पीसीबी) – दक्षिण आफ्रिकेतील गुप्ता बंधूंच्या दोन मुलांचा विवाह सोहळा औली येथे होणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या या शाही विवाह सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. लग्नासाठी तब्बल २०० हेलिकॉप्टरची बुकिंग करण्यात आली आहे. ८०० कर्मचारी लग्नाची तयारी करीत असून या लग्नावर तब्बल २०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

गुप्ता बंधू म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजय गुप्ता यांचा मुलगा सूर्यकांत याचे पहिले लग्न होणार आहे. त्यानंतर अतुल गुप्ता यांचा मुलगा शशांक याचं लग्न होणार आहे. १८ ते २२ जून या दरम्यान हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्नासाठी स्वित्झर्लंडहून ५ कोटींची फुले मागवण्यात आली आहे. बॉलिवूडमधील ५० अभिनेते, लेखक, निर्माते या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

 

लग्नात कोणतीच कसर राहू नये म्हणून डोंगर-दऱ्यांमध्ये असलेल्या दुकानांना देखील सजवले जाणार आहे. फिरायला आलेल्या पाहुण्यांना खाण्यामध्ये काहीही अडचण येऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. एका परदेशी कंपनीचे तब्बल ८०० कर्मचारी लग्नाची तयारी करण्यासाठी औलीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या लग्नाचीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. दिल्लीवरून देहरादूनला येण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय, या पाहुण्यांना हिमालयामध्ये देखील फिरवले जाणार आहे.