‘रोबोकप’ ज्यूनिअर स्पर्धेत एस.बी. पाटील पब्लिक स्कूल प्रथम

93

पिंपरी, दि.२० (पीसीबी) –  बेंगलूरू येथे झालेल्या ‘रोबोकप’ ज्यूनिअर स्पर्धेत दक्षिण विभागातून रावेत येथील एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या इयत्ता आठवीच्या टीमने ‘रेस्क्यु मेझ’ (भूल भुलैयातून रोबोटची सुटका) या प्रकारात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोबोटविषयी तांत्रिक माहिती व संगणक क्षेत्रातील ज्ञान मिळावे या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर ‘रोबोकप’ ज्यूनिअर स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षीची स्पर्धा शनिवारी, रविवारी (११ व १२ जानेवारी) बेंगलूरू येथे ‘सुटका, ऑनस्टेज, सॉकर’ या तीन प्रकारात घेण्यात आली होती. यामध्ये पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस.बी. पाटील पब्लिक स्कूलच्या टीमने (१९ वर्षाखालील) रोबोट बनवणे या प्रकारात उत्कृष्ट रोबोटची प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. वंदन शर्मा, निखिलेश सरोदे, अव्दैत भागवत, आनंद सुराणा या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका बिंदू सैनी, मार्गदर्शक शिक्षिका वर्षा गवळी, मोनिका गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारितोषिक पटकाविले. विजेत्या टीमला संयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. रोबोटिक्स नव्या युगाची गरज आहे, म्हणूनच प्राथमिकच्या विद्यार्थ्यांपासून एस.बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये रोबोटिक्सचे प्रशिक्षण देण्यात येते, असे मुख्याध्यपिका सैनी यांनी सांगितले. विजेत्या विद्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, मुख्याध्यपिका बिंदू सैनी यांनी अभिनंदन केले.