रोडवर उभा केलेला टँकर बाजूला घेण्यास सांगितल्याने दोघांना मारहाण

73

निघोजे, दि. १९ (पीसीबी) – रस्त्यावर उभा केलेला टँकर बाजूला घेण्यास सांगितल्याने बाप लेकाने मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 17) दुपारी पाच वाजता खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.

पांडुरंग कृष्णा कड आणि त्याचा मुलगा (दोघे रा. निघोजे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सखाराम अशोक यादव (वय 19, रा. निघोजे, ता. खेड. मूळ रा. धुनकवाड, ता. धारूर, जि. बीड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे दाजी राजकुमार आल्हाट हे आल्हाट वस्ती येथून दुचाकीवरून निघोजे येथे घरी जात होते. आल्हाटवस्ती जवळ आरोपी पांडुरंग कड याचा टँकर रस्त्यावर उभा होता. त्यामुळे टँकर चालक आणि पांडुरंग कड यांच्या मुलाला टँकर बाजूला घेण्यास फिर्यादी यांनी सांगितले. त्यावरून पांडुरंग कड याने फिर्यादी यांच्या दाजींना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपी पांडुरंग यांच्या मुलाने फिर्यादी यांना काठीने पाठीवर, हातावर मारून दुखापत केली. पोलीस हवालदार अशोक जयभाय तपास करीत आहेत.