रेशमी किड्याला आयुष्यातील उपहास समजणार नाही; आदित्य ठाकरेंच्या टीकेला अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर

108

मुंबई,दि.२६(पीसीबी) – रेशमी किड्याला आयुष्यातील उपहास समजणार नाही. कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन रेशमी आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होत असते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिनान वाटतो, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बांगड्या घालण्याच्या वक्तव्यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. या वादात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.

शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीसजी मी सहसा प्रत्युत्तर देत नाही. सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही बांगड्याबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागावी. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही, असं आदित्य यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या ह्या ट्विटला उत्तर देत अमृता फडणवीसांनी निशाणा साधला आहे.