रेल्वेतून १७ किलो सोने नेणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात

779

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – रेल्वेतून १७ किलो सोने नेणाऱ्या एका प्रवासी तरुणाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसमधून या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

मनीष असे या तरुणाचे नाव आहे. तो सूर्यनगरी एक्स्प्रेसमधील S9 कोचमध्ये बसला होता.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष हा मुंबईवरुन सुरतकडे तब्बल १७ किलो सोने ट्रेनमधून घेऊन जात होता. त्यावेळी तिकीट चेकरला मनीष याचा संशय आला. टीसीने याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसांनी मनीषला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची बॅग तपासली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने होते. पोलिसांनी या सोन्याचे वजन केले असता, ते १७ किलोपेक्षा जास्त असल्याचे समोर आले. बाजारभावाप्रमाणे त्याचे मूल्य कोट्यवधीच्या घरात जाते. १७ किलो सोन्याची किंमत अंदाजे ५ कोटी १० लाख रुपये आहे.

दरम्यान, हे पार्सल सुरतला पोहोचवायचे होते, त्याबदल्यात त्याला कमिशन मिळणार होते अशी माहिती मनीषने पोलिसांना दिली.