रेणू शर्माची मोठी बहिण मुंडे प्रकरणावर गप्प का?

0
313

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : राज्याचे सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने राज्यात खळबळ उडालीय. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्ट करत सविस्तर स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानंतर तसंच खुलाशानंतर काही सवाल उपस्थित होत आहे. “तक्रार करणारी महिला आणि धनंजय मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते संबंधात असलेली महिला दोघीही एकाच घरात रहातात मात्र मोठी बहीण यावर काहीच बोलत नाही. तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही?”, असा सवाल उपस्थित करताना आपल्या छोट्या बहीणीसाठी करुणा शर्मा यांनी धावून यायला हवं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकता स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा आणि पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या गायक महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसंच पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्या वाघ यांनी केली आहे. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

“धनंजय मुंडे यांच्यावर मुलीनं केलेल्या आरोपामध्ये काही जर तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणं त्यांना शिक्षा व्हावी, तसंच पोलिसांनीही या प्रकरणाची कसून तपासणी करावी”, असंही त्या म्हणाल्या.
“कितीही मोठा नेता असु द्या… दोषींना पाठीशी घालू नका.. जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे तसंच अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबीयांवर दबाव येऊ शकतो तसंच पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते, तपास कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं”, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलीय.