रेकी करून ज्वेलर्स शॉप, बँका फोडणाऱ्या पाच जणांना अटक; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

79

पिंपरी, दि.27 (पीसीबी) : रेकी करून ज्वेलर्स शॉप आणि बँका फोडणाऱ्या नेपाळी टोळीच्या पाच सदस्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्या दुकानात चोरी करायची आहे, त्याच्या बाजूचे दुकान भाड्याने घ्यायचे आणि वेळ गाठून भिंत फोडून चोरी करण्याची या टोळीची पद्धत होती. बावधन येथे 18 जून रोजी एका ज्वेलर्सच्या दुकानात अशा प्रकारची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

जगत बम शाही वय 28, रा. क्रिस्टल पैलेस, क्रिष्णा कॉलनी, मारुंजी पुणे. मुळ रा. गाव गटाडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छम, नेपाळ), गणेश विष्णु शाही (वय 33, मूळ रा. गाव भुरुआ, लम्की टिकापुर रोड, जि. कैलासी, नेपाळ), खगेंद्र दोदी कामी (वय 27, मूळ रा. घाटगाऊ चौगुने गाव पालिका जि. सुरखेत नेपाळ), प्रेम रामसिंग टमाटा (वय 42, सध्या रा. पद्मालय पार्क, लंडन ब्रिज जवळ, पुनावळे, पुणे. मुळ रा. कालकांडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छम, नेपाळ), रईस कादर खान वय 52, रा. तीन डोंगरी, प्रेम नगर, उन्नत नगर रोड क्र.2 साईबाबा मंदीर समोर, गोरेगाव (पश्चिम) मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

जगदंबा ज्वेलर्स, शॉप नं. 2, गीतांजली अपार्टमेंट, हुतात्मा चौक, बावधन बु. या शॉपच्या बाजूचे दुकान आरोपींनी 15 जून रोजी चायनीज व्यवसायासाठी भाड्याने घेतले. 18 जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ज्वेलर्स दुकानदाराने दुकान उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शेजारील चायनिज दुकानातून पोटमाळ्यावरील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करून गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तिजोरी न फुटल्याने दुकानातील वर ठेवलेले चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन व सीसीटीही डीव्हीआर असा एकूण तीन लाख 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच गुन्ह्याची पद्धत वेगळी असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हा गुन्हा गुन्हे शाखा युनिट चारकडे वर्ग केला. पोलिसांनी घटनास्थळावरील, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत तांत्रिक सुरू केले.

या गुन्ह्यात आजूबाजूच्या परिसरात काम करणारे नेपाळी वॉचमन सामिल असण्याची दाट शक्यता पोलिसांना वाटली. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात मारुंजी परिसरात वॉचमन म्हणून काम करणारा एक इसम सदर गुन्ह्यात सामिल असल्याबाबत संशय आल्याने तसेच तो घटना झाल्यापासून काम सोडून गेल्याचे कळाल्याने त्याच्यावरील संशय बळावला. त्याच्याबाबत माहिती काढून पोलिसांनी जगत बम शाही याला अंबरनाथ येथून 12 जुलै रोजी अटक केली. त्याने त्याच्या तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गणेश, खगेंद्र, प्रेम या तिघांना ठाणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली.

वरील आरोपींनी कार चालक अटक आरोपी रईस आणि फरार आरोपी शंकर चंद्र उर्फ कांचा लामा (रा. धनगढी नेपाळ), अर्जुन उर्फ ओम रावल रा. धनगढी, नेपाळ), बादल लामा (रा. धनगढी, नेपाळ), तसेच शंकर चंद्र उर्फ कांचा लामा याचे झारखंड येथून बोलावलेले तीन साथीदार यांनी केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

अटक केलेल्या आरोपींकडून एक किलो 719 ग्रॅम चांदीचे दागिने, 11 ग्रॅम सोन्याचे दागिने, इनोव्हा कार, दुचाकी, मोबाईल फोन असा एकूण 12 लाख तीन हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या प्रकरणात अटक आरोपी गणेश शाही व पाहिजे असलेला आरोपी शंकर चंद्र उर्फ कांचा लामा हे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी चोरी करण्यासाठी सोनारा दुकानाशेजारील दुकान भाड्याने घेता येईल अशा ब-याच ठिकाणांची पाहणी केली. त्यापैकी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एक आणि बावधन येथील एका सोनाराचे दुकान पाहून ठेवले होते. त्यानंतर आरोपींना 15 जून रोजी बावधन येथील ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूचे दुकान भाड्याने मिळाले. लगेच आरोपींनी त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले आणि 17 जून रोजी रात्री भिंत फोडून चोरी केली.

हे प्रकरण शांत झाल्यावर ते काही दिवसांनी परत येवून सांगवी परिसरातील पाहून ठेवलेल्या दुकानात याच प्रकारे चोरी करण्याच्या विचारात होते. तसेच आरोपीकडे केलेल्या तपासात गणेश शाही व शंकरचंद्र लामा या दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांसोबत 30 मे रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे स्थानिक वॉचमनच्या मदतीने एका बँकेचे शटर कापून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

या आरोपिंची मोठी टोळी आहे. या टोळीने यापूर्वी अशाच पद्धतीने अनेक गुन्हे केलेले आहेत. गणेश शाही याच्यावर घरफोडीचे व दरोडयाच्या प्रयत्नाचे एकूण 12 गुन्हे, प्रेम टमाटा याच्या विरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत. पाहिजे आरोपी शंकरचंद्र लामा ऊर्फ कांचा याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच सदर आरोपी हे अत्यंत चलाख असून ते आपसात बोलण्यासाठी नेहमी फेसबुक मॅसेंजरचा वापर करत होते. त्याद्वारे आरोपी एकमेकांना ऑडिओ व व्हिडिओ कॉल करत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सिद्धनाथ बाबर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोलीस अंमलदार प्रविण दळे, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, राहिदास आडे, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, तुषार काळे, अजिनाथ ओबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, आणि तांत्रिक विश्लेषन विभाग (गुन्हे शाखा) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, विकास आवटे, पोपट हुलगे यांनी केली आहे.

WhatsAppShare