रूपयाची सत्तरी पार; अखेर मोदी सरकारने करून दाखवले – काँग्रेस

339

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेल्या रुपयाने निचांकी पातळी गाठली आहे. एका रुपयाची किंमत डॉलरच्या तब्बल ७० रुपयांपर्यंत घसरली आहे. रुपयाचे इतिहासातील हे सर्वात मोठे अवमूल्यन आहे. त्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ७० वर्षात कधी घडले  नव्हते, ते मोदी सरकारने अखेर करून दाखवले, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

मागील ४ वर्षात मंदावलेली निर्यात आणि चलन फुगवटा यामागची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया मजबूत करायचा असल्यास, सरकारने निर्यातीवर भर द्यावा, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. दरम्यान, रुपयाची सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६९.९३ इतके घसरले होते. आज ६९.८४ रुपयांवरुन बाजार सुरु झाल्यानंतर रुपया डॉलरच्या तुलनेत ७०.०८ इतका घसरला.

यावर ‘जनता झेल रही है मार, रुपया पहुंचा ७० के पार, अब तो जागो मोदी सरकार’, असे ट्विट आपने केले आहे. दरम्यान, रुपयाची सुरू असलेली घसरण थांबवण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केला नसल्याची चर्चा आहे. सोमवारी सायंकाळीच डॉलरच्या तुलनेत रुपयाची आणखी घसरण झाली होती.

अमेरिकेने तुर्कीसोबतच्या व्यापारात आयात करात वाढ केल्यानंतर फॉरेक्स मार्केटमध्ये उलथापालथ झाली. तुर्कीस्थानचे चलन ‘लीरा’चा दर कोसळला. त्यानंतर आणखी इतर देशांच्या चलन दरावर या घडामोडींचा परिणाम झाल्याने दर कोसळले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.