रुपाली चाकणकरांचा 2 वर्षाचा ‘हिशेब’

124

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन रुपाली चाकणकर यांना दोन वर्ष झाली. प्रदेशाध्यक्षा म्हणून आज त्यांची द्वितीय वर्षपूर्ती… या दोन वर्षाच्या काळात त्यांनी पक्षासाठी नेमकं काय केलं?, याचा हिशेब चाकणकरांनी पक्षाला सांगितला आहे. तसंच येत्या वर्षात पक्षासाठी कोणता संकल्प केलाय, याची कल्पणाही त्यांनी पक्षनेतृत्वाला दिली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा पदाची द्वितीय वर्षपूर्ती झाली.आदरणीय पवार साहेबांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिल्यानंतर पहिले वर्ष निवडणुका, सत्ता-स्थापना, कोरोना आपत्ती या सर्व महत्वाच्या घडामोडींमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या वर्षात संघटनात्मक बांधणी, कोव्हीड काळातील मदतकार्य, स्थानिक स्वराज्य निवडणुकांची मोर्चेबांधणी या संघटनात्मक घटनांनी भरगच्च असे गेले.

या काळात अनेक नवीन सहकारी या प्रवासात सोबत जोडले गेले. संपूर्ण संघटना मिडीयाच्या माध्यमातून अजून जोडली गेली. वेळोवेळी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे आणि पक्षाच्या इतर सर्व जेष्ठ मंडळींच्या सल्ल्यानुसार पक्षाची सर्वच बाबतीत वेळोवेळी बहुमोल असे मार्गदर्शन केले.

गावोगावी खेडोपाडी राष्ट्रवादी घरोघरी यांसारख्या अभियानाच्या माध्यमातून पक्ष अगदी लहानात लहान गाव-वस्ती पर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून सुरू आहे. सर्वसामान्य, तळागाळातील निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांनी यावेळी मोलाची साथ दिली. वरिष्ठांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. पक्षातील सर्वच सहकाऱ्यांनी मनापासून साथ दिली.

पक्षवाढीसाठी जे जे आवश्यक, ते ते करीन…
आजवर केलेल्या कामांचा अनुभव गाठीशी असतांना येत्या काळात सुध्दा पक्षवाढीसाठी जे जे आवश्य असेल ते सर्व उपक्रम करण्याचा दृढ संकल्प आहे. आपल्या सर्वांचे प्रेम नेहमी असेच वृद्धींगत होत राहो.

रोखठोक, आक्रमक, लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून चाकणकरांची ओळख
रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेललीय. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिलाय. त्या पुण्याच्या स्थानिक राजकारणात देखील उत्तम भूमिका बजावतात.

WhatsAppShare