रुग्ण गंभीर अवस्थेत आहे असं कळल्यावर इंजेक्शनसाठी घेतले ५० हजार; पण इंजेक्शन न देताच….

330

देहूरोड,दि.१२(पीसीबी) – एका व्यक्तीने कोरोना आजारात उपचारासाठी वापरले जाणारे अलझुमॅब एल हे इंजेक्शन तब्बल 50 हजार रुपयांना विकले. ग्राहकाकडून पैसे घेऊन त्याला इंजेक्शन दिले नाही. तसेच पैसेही परत दिले नाहीत. याबाबत एकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 एप्रिल रोजी रात्री गुरुद्वारा रोड, देहूरोड येथे घडली.

अनुज सोपान नाईकरे (वय 31, रा. यमुनानगर, निगडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अनिल गोविंद ठोंबरे (वय 47, रा. देहूरोड) यांनी मंगळवारी (दि. 11) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मावस बहिणीच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्याला देहूरोड येथील शुभश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तो गंभीर अवस्थेत असताना डॉक्टरांनी त्याला अलझुमॅब एल या इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे सांगितले. दरम्यान फिर्यादी यांचा आरोपी सोबत संपर्क झाला. आरोपीने अलझुमॅब एल हे इंजेक्शन 50 हजार रुपयांना विकत मिळेल असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 50 हजार रुपये आरोपीला दिले.

दरम्यान पैसे घेतल्यानंतर देखील आरोपीने फिर्यादी यांना इंजेक्शन दिले नाही तसेच त्यांचे पैसेही देण्यास टाळाटाळ केली. याबाबत विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare