‘रिलायन्स’ने केली ‘जिओ फायबर’ची घोषणा; ७०० रुपयांत सुपरफास्ट इंटरनेट

157

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – आपण सध्या इंटरनेटच्या २ ते ५० एमबीपीएस वेगाचा लाभ घेतो. हाच वेग १००० एमबीपीएसवर गेला तर?… पापणी लवण्याच्या आत हवं ते सर्फ करता येईल! ‘प्रकाशाच्या वेगाइतकी गती देणारा इंटरनेट स्पीड’ अशा शब्दांत रिलायन्स उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या या बहुप्रतिक्षीत ‘जिओ फायबर योजने’ची घोषणा आज केली. जिओच्या लॉंचिंगच्या तिसऱ्या वर्धापनदिनी म्हणजेच येत्या ५ सप्टेंबरपासून जिओ फायबर लाँच होणार आहे. यात इंटरनेट प्लान्स अगदी ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात मिळणार आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजची आज मुंबईत ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यात ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स फायबरमध्ये १ जीबीपीएसपर्यंतचा अफाट इंटरनेटचा स्पीड ग्राहकांना मिळणार आहे. मुकेश अंबानी म्हणाले, ‘नव्या भारताचा उदय होतोय. भारताची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. गेल्या वर्षभरात रिलायन्सचे मोठी भरारी घेतली. जिओनं बाजारपेठेचा ३२ टक्के हिस्सा व्यापला आहे. रिलायन्स हा सर्वाधिक आयकर भरणारा उद्योग समूह आहे.’

जिओ फायबरबद्दल अंबानी म्हणाले, ‘१६०० शहरांमधून १५ दशलक्ष लोकांनी गिगाफायबरची नोंदणी केली होती. जिओ फायबर प्रायोगिक तत्वावर सुरू केलं होतं. जिओ फायबरमुळे तुम्हाला प्रकाशाच्या वेगाचा ब्रॉडबँड स्पीड मिळेल. याव्यतिरीक्त अन्य अनेक स्मार्ट होम सुविधा आहेत.’

तंत्रज्ञानाच्या जगाचा आनंद जिओ फायबरमुळे ग्राहकांना लुटता येणार आहे. याचे एक उदाहरण म्हणजे मिक्स्ड रिअॅलिटी. ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीने तंत्रज्ञानाच्या जगात आमूलाग्र बदल घडवले. या दोहोंचे मिश्रण असलेली मिक्स्ड रिअॅलिटी (AR+VR)जिओ गिगाफायबरवर उपलब्ध होणार आहे,’ अशी घोषणा इशा अंबानी यांनी यावेळी केली. या मिक्स्ड रिअॅलिटीची एक झलकच त्यांनी एका व्हिडिओ क्लिपने व्यासपीठावर दाखवली.