रिक्षाचालक मंगळवारपासून राज्यव्यापी संपावर

97

मुंबई, दि, ७ (पीसीबी) – मुंबई, ठाण्यासह राज्यातील अन्य शहरांमधील रस्त्यांवर ९ जुलैला रिक्षा धावणार नाहीत. रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करण्याच्या मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटनांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे. 

राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या. मात्र, मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, असे रिक्षाचालक संघटनांचे म्हणणे आहे. संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील लाखो रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. त्यामुळे दररोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत.

  ओला, उबरसारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी , रिक्षा चालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे,  विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे तिथे न भरता कल्याणकारी महामंडळात जमा करावे . चालक-मालकांना पेन्शन, उपदान (ग्रॅज्युईटी), भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत दिली जावी.  जुन्या हकिम समितीच्या शिफारशीनुसार तातडीने रिक्षा भाडेवाढ करावी . चार ते सहा रुपये भाडेवाढ करावी , बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करावी, आदी मागण्यासाठी संपावर जाणार आहे.