राहुल गांधी,रणदिप सुरजेवाला यांच्याविरोधात अहमदाबाद सहकारी बँकेचा अब्रुनुकसानीचा दावा

68

अहमदाबाद, दि. २८ (पीसीबी) – नोटाबंदी दरम्यान पाच दिवसांत ७५० कोटी रूपयांचे जुने चलन बदलून घेतल्याचा  आरोप केल्याप्रकरणी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने (एडीसीबी) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रणदिप सुरजेवाला यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या दोन्ही नेत्यांनी बँकेविरोधात खोटे आरोप केल्याचे या बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी म्हटले आहे. याप्रकरणी १७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

नोटाबंदीमुळे कोट्यवधी लोकांचे जीवन उद्धवस्त झाले आहे. मात्र, तुम्ही मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा बदलून घेतल्याचे कौतुक वाटत आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता. तर सुरजेवाला यांनीही पत्रकार परिषद घेऊन बँकेवर आरोप केले होते.

राहुल गांधी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आरोप करताना २२ जून रोजी एक ट्विट केले होते. अभिनंदन, अमित शाहजी संचालक, अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक. तुमच्या बँकेने पहिल्या पाच दिवसांत ७५० कोटी रूपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्यामुळे तुम्हाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. लाखो भारतीयांचे आयुष्य नोटाबंदीमुळे उद्धवस्त झाले आहे. तुमच्या या यशाला माझा सलाम, असे उपरोधिक ट्विट त्यांनी केले होते.