राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहतील

92

नवी दिल्ली, दि.१२ (पीसीबी) – राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील अशी माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली असून काँग्रेस नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी काँग्रेस नेते वारंवार राहुल गांधींची भेट आहेत. मात्र राहुल गांधी आपल्या मतावर ठाम असल्याचे कळत होते. पण सुरजेवाला यांनी राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेत्यांनी नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी हरियाणा, जम्मू, काश्मीर, झारखंड आणि महाराष्ट्रामधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसंबंधी चर्चा करण्यात आली. यासोबतच निवडणुकीत काय रणनीती असेल यावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर बोलताना रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली.

२५ मे रोजी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. काँग्रेस कार्यकारिणी समितीने प्रस्ताव फेटाळला असला तरी राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ‘राहुलजी होते, आहेत आणि काँग्रेस अध्यक्ष राहतील. याबाबत कोणतीही शंका नाही’, असं रणदीप सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.